लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रे आणण्यास सुरूवात; लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूकही होण्याची शक्यता

0
981

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अनुक्रमे ८ आणि १३ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. असे असतानाही निवडणूक आयोगाने आत्ताच तयारी सुरू केली आहे. खरेतर मतदान यंत्रे निवडणुकीच्या चार ते सहा महिने आधीच इतर जिल्हे अथवा राज्यातून त्या-त्या जिल्ह्यात आणली जात असताना राज्यातील अनेक जिल्ह्यात आताच मतदान यंत्र आणली जात आहेत. त्यामुळे राजकीय विश्लेषक, राजकारण्यांकडून सुरू असलेल्या मुदतपूर्व निवडणुकांच्या चर्चेला काही प्रमाणात निवडणूक आयोग आणि निवडणूक यंत्रणेच्या लगबगीमुळे पुष्टी मिळत असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रातील भाजप सरकारला “एक देश, एक निवडणूक” पॅटर्न अपेक्षित आहे. तसेच निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत सर्वच राजकीय पक्ष शंका उपस्थित करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पारदर्शकतेसाठी व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निवडणुकांसाठी एम-थ्री इव्हीएम मशीन विकसित करण्यात आले आहेत.

निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचे कंट्रोल युनिट तसेच बॅलेट युनिट राज्यातील अनेक जिल्ह्यात आणण्यास सुरूवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये मतदान यंत्रे पोचली आहेत. व्हीव्हीपॅटही काही दिवसांत आणण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या मशिनची जुळवणी आत्ताच होत असल्याने कदाचित सहा महिन्यांच्या कालावधीत लोकसभा निवडणूक होण्याची म्हणजेच मुदतपूर्व अर्थात जानेवारी-फेब्रुवारीतच निवडणुकांची शक्यताही वर्तविली जात आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सोबतच होण्याची शक्यताही अधिक आहे.