लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर; पुण्यातून गिरीश बापट यांना संधी

0
601

पुणे, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शुक्रवारी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात ३६ उमेदवारांचा समावेश आहे. ३६ जागांमध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, आसाम आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहा जागांचा यात समावेश असून जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत १८४ उमेदवारांचा समावेश होता. तर शुक्रवारी रात्री जाहीर ३६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना देखील स्थान मिळाले आहे. ओदिशामधील पुरी येथून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत राज्यातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यात पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपा पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन यांच्या गटातील आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.