लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली; निकालाची धाकधूक वाढली

0
440

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी आज (रविवार) मतदान झाले. गेली दोन महिने सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपली. वैशाख वणव्यात वाढलेला प्रचाराचा ज्वरही उतरला. प्रचाराचा धुरळा बसला. आता सर्वांचे लक्ष २३ मेरोजीच्या निकालाकडे असेल. श्रमपरिहरासाठी निवांत ठिकाणी गेलेले लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आपआपल्या मतदारसंघात परतले. कार्यकर्त्यांनीही मतदानाची आकडेवारी समोर ठेवून आकडेमोड करण्यास सुरूवात केली आहे. निकालासाठी अवघे तीन दिवस राहिले असून निकालाचा दिवस जसा जवळ येईल, तशी उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची धाकधूक, हुरहूर वाढू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवून दिली. एकमेकांवर वैयक्तिक केलेल्या टीकाटिप्पणीमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. प्रचारात विकासाच्या मुद्‌द्यापेक्षा एकमेकांची उणीदुणी काढण्यात नेत्यांनी पसंती दिल्याचे दिसून आले. कधी नव्हे इतके प्रचाराच्या पातळीने खालचे टोक गाठले. भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, तृणमुल काँग्रेस, आप या पक्षांतील नेत्यांनी आक्रमक प्रचारावर भर दिला.

लोकसभेच्या प्रचारात वाचाळवीर नेत्यांच्या वादग्रस्त विधानांना उधाण आले होते. भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आझम खान, काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू, मणिशंकर अय्यार, सॅम पित्रोदा, बसपाच्या प्रमुख मायावती, यांच्या बेताल विधानांनी वादंग उठले. अखेर या नेत्यांवर निवडणूक आयोगाला प्रचार बंदी घालवी लागली. तर पक्ष प्रमुखांना आपल्या नेत्यांना तोंडे बंद करण्यासाठी तंबी द्यावी लागली.

लोकसभेसाठी १ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. तर १९ मेला अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान झाले. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा अपवाद वगळता देशभरात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांतील हिंसाचारामुळे निवडणूक प्रक्रियेलाच गालबोट लागले. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा केला.

तर दुसरीकडे, कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास भाजपविरोधी पक्षांची महाआघाडी करण्यासाठी विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी, युपीएच्या अध्यक्षा व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आदी नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे.