लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल शुक्रवारी पहाटे जाहीर होणार  

0
446

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – बहुतांश एक्झिट पोलने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीएचे सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, सर्वांचे लक्ष गुरूवारी (दि.२३) जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. तर निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी    शुक्रवारची (दि.२४)  पहाट उजाडण्याची शक्यता आहे.  कारण व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप मोजण्यात येणार आहेत. त्यासाठी  अतिरिक्त  वेळ लागणार  असल्याने रात्री दोन वाजेपर्यंत अंतिम निकाल लागू शकतो.   

देशभरातील ५४३ पैकी ५४२  मतदारसंघाच्या मतमोजणीला गुरूवारी (दि.२३ ) सकाळी  ८ वाजता सुरुवात होणार आहे. पहिल्या फेरीचा कल अर्ध्या तासानंतरच  समोर येईल. दरम्यान, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून  १ याप्रमाणे ५ मशीनमधील स्लिपची मोजणी शेवटी  केली जाणार आहे. व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी अतिरिक्त  ५  तास लागणार आहेत. त्यामुळे  अंतिम निकाल  समोर  येण्यासाठी रात्री २ वाजण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी  केली जाईल. पोस्टल मतांची खातरजमा करण्यासाठी ईटीपीबीएस पद्धतीचा वापर  केला जाईल. मुख्य लिफाफा, मतपत्रिका असलेला लिफाफा आणि प्रत्यक्ष मतपत्रिका यावरील बारकोड स्कॅन करुन मतपत्रिकेची खात्री झाल्यानंतरच ती मोजणीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहेत.  त्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएमची मोजणी सुरू करण्यात येईल. एकाच वेळी जास्तीत जास्त १४ ईव्हीएमची मोजणी  केली जाईल.

या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर केला आहे. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट जोडले असून स्लिपची मोजणीही त्याच वेळी होणार आहे. प्रक्रियेनुसार सर्वात आधी  ईव्हीएम वरील  कंट्रोल यूनिट च्या निकालाच्या बटणाने मोजणी होईल.  यानंतर पाचही व्हीव्हीपॅटचे निकाल कंट्रोल यूनिटच्या आकड्यांशी जुळवले जातील.

पिजन होल बॉक्समधील स्लिपच्या संख्येसोबतही मतांची संख्या जुळवली जाईल. मतदान करताना ईव्हीएमच्या उजव्या बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅटमध्ये ही स्लिप दिसेल. या स्लिपची मोजणीही मतांच्या मोजणीसोबत झाली होती.

दरम्यान, काही तांत्रिक कारणावरुन मतमोजणी प्रक्रियेला  उशीर झाला किंवा कोणी हरकत घेतली. तर मतदानयंत्र निवडणूक अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात येईल आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.