लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

0
448

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – ओम बिर्ला यांची सतराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी आज बिनविरोध निवड झाली. राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून बिर्ला हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. पंतप्रधान मोदींनी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. यानंतर बिर्ला यांच्या नावाला सभागृहात काँग्रेस तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि बीजेडीनेही पाठिंबा दर्शवला.

लोकसभेत बिर्ला यांच्यातील शिस्तीतून सर्वांना प्रोत्साहन मिळेल. बिर्ला हे अतिशय मृदू भाषेत संवाद साधतात. यामुळे त्यांच्या विवेक आणि नम्रतेचा सभागृहात दुरुपयोग होण्याची भीती वाटते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. बिर्ला हे विद्यार्थी दशेपासून लोकसेवेत आहेत. गुजरातमधील भूकंप असो की केदरानाथमधील ढगफूटी बिर्ला हे मदतीसाठी कायम पुढे राहिले, अशा शब्दात मोदींनी त्यांचं कौतुक केलं. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचेही पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. महाजन हसतमुख होत्या, असं मोदी म्हणाले. बिर्ला यांच्या आधी लोकसभा अध्यक्षपदासाठी संतोष गंगवार आणि मनेका गांधी यांच्या नावाची चर्चा होती. पण ज्येष्ठतेपेक्षा निष्ठा आणि कार्यक्षमतेला महत्त्व देत भाजपश्रेष्ठींनी ५७ वर्षीय खासदार ओम बिर्ला यांच्या नावाला पसंती दिली. बिर्ला हे सन २००३ ते २०१३ दरम्यान तीनवेळा राजस्थान विधानसभेचे सदस्य होते. राजस्थानचा सर्वात मोठा वैश्य चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. राजस्थानच्या राजकारणात वसुंधरा राजे यांचे विरोधक असण्याचाही त्यांना लाभ मिळाल्याचे म्हटले जात आहे. बिर्ला यांच्या निवडीमुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले मनेका गांधी, राधामोहन सिंह आणि वीरेंद्रकुमार यांची आशा मावळली.