Pune

लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

By PCB Author

January 25, 2020

पुणे दि.२५ (पीसीबी) – मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा हक्क आहे. तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होत असल्याने प्रत्येक मतदारांने आपला मतदानाचा हक्क बजवावा. तसेच नवमतदारांनी मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार दहाव्‍या राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, २५  जानेवारी  १९५० भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस. या दिनानिमित्त संपूर्ण देशात 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. २०११ पासून हा दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार नोंदणी करावी आणि प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा हा भारत निवडणूक आयोगाचा संकल्प आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी आणि मतदान करावे. भारत निवडणूक आयोगाकडून या वर्षाच्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे घोषवाक्य `बलशाली लोकशाही करिता निवडणूक साक्षरता` असे आहे. त्यामुळे युवक, युवती यांनी सक्षम होवून मतदार नोंदणी करून राष्ट्राच्या जडण-घडणीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी राम म्हणाले, प्रत्येक मतदाराने मतदान करून अन्य मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक- युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करावी. दिव्यांग व वृध्द व्यक्तींना मतदानासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील,     मतदारांच्या   तक्रारी सोडविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत कॉल सेंटर सुरू करण्यात आले, त्यामाध्यमातून अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. नवमतदारांनी मतदार  जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, मतदान हा लोकशाहीचा पाया आहे, त्यामुळे हा पाया भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने जागृतपणे आपला मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक असल्याचे सांगितले.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. मतदार जागृती रॅलीस सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात झाली. मोठ्या संख्येने वि्द्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. म्हैसेकर, जिल्हाधिकारी राम आणि मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांना तसेच नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. उपस्थितांना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी मतदान हक्क बजावण्याबाबत आणि लोकशाही बळकटीकरणाबाबतची प्रतिज्ञा दिली. राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या निबंध,बुदधीबळ, चित्रकला, रांगोळी, उत्कृष्ट काम करणा-या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, उत्कृष्ट पर्यवेक्षक, उत्कृष्ट अधिकारी तसेच स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. 

मतदार जागृतीसंदर्भात सादर झालेले पथनाट्य, दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सांस्कृतिक गीतांनी या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. संत नामदेव माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गात कार्यक्रमात सहभागी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी केले,सूत्रसंचलन शिक्षिका मेधा हातोळकर यांनी तर आभार सहायक मतदार नोंदणी अधिकारी रंजना उंबरहांडे यांनी मानले. 

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक शाखेचे कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.