Maharashtra

‘लोकमंगल’ वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश; सहकारमंत्री सुभाष देशमुख गोत्यात   

By PCB Author

November 29, 2018

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र  लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश राज्याचे अवर सचिव गोविल यांनी दुग्धव्यवसाय आयुक्तांना दिले आहेत. लोकमंगल मल्टीस्टेटने राज्य सरकारकडून दूध प्रकल्पाला ५ कोटी रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी बनावट, खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या प्रकारानंतर सरकारने हा प्रकल्प रद्द करीत ५ कोटी रुपयांचे अनुदान सरकारला परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र, लोकायुक्तांसमोर झालेल्या सुनावणी दरम्यान स्वतः पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी हजर राहत लोकमंगलवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत .

लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लि. जिल्हा सोलापूर या संस्थेच्या राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत २४ कोटी ८१ लाख रुपयांच्या दुध प्रकल्पाची शासन मान्यता रद्द करीत या प्रकल्पासाठी वर्ग करण्यात आलेला ५ कोटी रुपयांचा अनुदान निधी संबंधित विभागाकडे प्रत्यार्पित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग अपर सचिव राजेश गोविल यांनी २२ नोव्हेंबर रोजी दिले आहेत.