लॉकडाऊन काळात कमी केलेल्या कॅप जेमिनीच्या ३०० कामगारांना परत कामावर घ्या – सहाय्यक कामगार आयुक्तांचे आदेश

921

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – कोरोना लॉकडाऊनच्या काळात कमी केलेल्या ३०० कामगारांना पुन्हा त्वरित कामावर घ्या, असे स्पष्ट आदेश सहाय्यक कामगार आयुक्त समीर चव्हाण यांनी दिले आहेत. दरम्यान, कोरोना काळात नोकऱ्या गेलेल्या बहुसंख्य आयटी कामगारांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक असल्याने आयटी कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
लॉकडाऊन २५ मार्च पासून सुरू झाला, त्या दरम्यान विविध कारणे देत कॅप जेमिनी कंपनीने ३०० कामगारांना एका झटक्यात घरी पाठवले. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे या कामगार संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी त्या विरोधात २६ जून रोजी कामगार आययुक्तालयात तक्रार केली होती. नॅशनल इन्फॉर्मेशन ट्क्नॉलॉजी एम्प्लॉईज युनियन सेना या नव्याने स्थापन झालेल्या आयटी कामगारांसाठी संघटनेचे अध्यक्ष व सचिव हरप्रित सलुजा यांनीही याच विषयावर लेखी अर्ज केला होता. त्यावर कामगार आयुक्तांनी आज आदेश काढले आणि सर्व कामगारांना तत्काळ कामावार रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

कामगारांना कमी केल्याच्याया विषयावर चर्चा कऱण्यासाठी १३ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता कामगार उप आयुक्त कार्यालयात बैठक निमंत्रीत केली आहे. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी या बैठकिला कंपनी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी अशा दोघांनीच आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावेस असे चव्हाण यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

कामागारांबद्दल जो आदेश झाला आहे त्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष हरप्रित सलुजा म्हणाले, एप्रिल पासून आमच्याकडे अशा तक्रारी येत आहेत. कॅप जेमिनीचे मुख्य अधिकारी अश्विन यार्दी यांनी आम्हाला सक्तीने राजीनामे द्यायला सांगितल्याच्या तक्रारी कामगारांनी केल्या. ही कारवाई अगदी बेकायदा होती. महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोनाच्या या परिस्थितीबद्दल ३१ मार्चला जो अद्यादेश काढला आहे बरोबर त्याच्या विरोधात ही कृती होती. कंपनीने या कामागारांना सक्तीच्या रजेवर पाठवले. सरकारच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की कोणाही कामगाराला कमी करू नये, पण त्यानंतरही कॅप जेमिनी कंपनीने कामगारांना कमी केले.

संघटनेचे विवेक मेस्री म्हणाले, आमची संघटना आता आयटी कामगारांसाठी आक्रमकपणे काम करते आहे. आज जो आदेश कामगार आयुक्तांनी दिला त्याचा विशेष आनंद आहे. ज्या कामगारांवर असे अन्याय होत असतील त्यांनी संघटनेकडे लेखी तक्रार करावी.