लॉकडाऊन काय बंद, काय सुरू – आयुक्तांकडून नियमावली जाहीर

0
291

 

पिंपरी, दि. 12 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (रविवारी) लॉकडाऊन ची नियमावली घोषित केली. या नियमावलीनुसार शहरातील सर्वच्या सर्व अस्थापना, किराणा दुकाने, कंपन्या पहिले पाच दिवस पूर्णत: बंद राहणार आहेत. केवळ दूधविक्रेते, वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकानांसह शासकीय प्रकल्पांची कामे सुरू राहणार आहेत. 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत मात्र शिथिलता देण्यात आली आहे.
पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरात रोजच तीनशे ते चारशेहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. करोनाची साखळ तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित करावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवार दि. 13 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून गुरुवार दि. 23 जुलै रोजी रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजेच दहा दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या वेळी नेमकी नियमावली जाहीर करण्यात आली नव्हती.
आज (रविवारी) महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी लॉकडाऊनच्या कालावधीसंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शहरातील किराणा दुकाने, सर्व प्रकारची किरकोळ व ठोक दुकाने, इतर सर्व प्रकारचे व्यवसाय, सर्व प्रकारच्या कंपन्या बंद राहणार आहेत. सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, उपाहारगृह, लॉज, हॉटेल, मॉल, रिसॉर्ट, बाजार, केश कर्तनालये, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, आडत दुकाने, भाजीपाला मार्केट, फळविक्रेते, आठवडा बाजार, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, खासगी शिकवणी वर्ग, सार्वजनिक व खासगी बससेवा, सर्व प्रकारची बांधकामे, चित्रपटगृह, व्यायामशाळा, वाचनालये, करमणूक केंद्र, बार, सर्व प्रकारची सभागृहे, जलतरण तलाव, मंगल कार्यालये तसेच ऑनलाइन पोर्टलवरून खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या संस्थांसाठी पहिले पाच दिवस पूर्णत: बंद राहणार आहेत.
तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळेही या कालावधीमध्ये बंद राहणार असून कसल्याही प्रकारची होम डिलिव्हरी या कालावधीत सुरू राहणार नाही. 19 तारखेपासून सकाळी 8 ते दुपारी 12 या कालावधीत जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरू राहणार आहेत. यामध्ये किराणा दुकान, दूधविक्रेते, आठवडे बाजार, फेरीवाले, भाजी, फळांचे विक्रेते, मटन, चिकण, अंडीविक्री करणारी दुकाने उघडता येणार आहेत. तसेच 19 तारखेपासून ई-कॉमर्सच्या वेबसाइट सुरू राहतील तसेच त्यांचा पुरवठाही सुरळीत होईल.
वरील बाबी बंद ठेवण्यात येणार असल्या तरी काही सुविधा सुरू ठेवल्या जाणार आहेत. यामध्ये घरपोच दूध वितरण करता येणार असून, सर्व खासगी व शासकीय वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत. शहरातील सर्व मेडिकल दुकाने या काळात उघडी राहतील. औषध व अन्न उत्पादन प्रक्रिया करणारे उद्योग, त्यांचे पुरवठादार नियमितपणे आपले उद्योग सुरू ठेवतील; मात्र त्यांना एमआयडीसीच्या पोर्टलवरून परवाना घ्यावा लागणार आहे. महापालिकेची विकासकामे, मेट्रो, स्मार्ट सिटीचे तसेच राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे उद्योग या कालावधीत सुरू राहणार आहेत. जे उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यांना आपल्या पूर्वपरवाना घेतलेल्या व निश्‍चित केलेल्या वाहनातून आपल्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करावी लागणार आहे.
’या’ उद्योगांना मिळणार परवानगी
आपल्या खासगी अथवा एमआयडीसीच्या जागेत ज्या कंपन्या अथवा उद्योग आहेत त्यांना कंपनी चालविता येणार आहे. मात्र त्यासाठी लॉकडाऊनच्या दहा दिवसांच्या कालावधीत कंपनीमधील कामगारांच्या राहण्याची व भोजनाची सोय त्यांना करावी लागणार आहे. कंपनीबाहेर येता येणार नाही. असाच नियम बांधकामांच्या साईटसाठीही लागू करण्यात आला आहे. जे बांधकाम व्यावसायिक आपल्या कामगारांची राहण्याची व भोजनाची सोय करतील त्यांना परवानगी घेऊन आपली साईट चालू ठेवता येणार आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तू, औषधे, तयार केलेले अन्नपदार्थ घरपोहोच देण्यासाठी सकाळी 8 ते 10 या वेळेत परवानगी राहणार आहे.
शेतीप्रक्रिया उद्योगही सुरू राहणार
पिंपरी-चिंचवड शहरात तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये शेतीप्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना लॉकडाऊनच्या कालावधीत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यांना कोविडच्या नियमावलीची बंधने पाळून काम सुरू ठेवता येणार आहे. याशिवाय सर्व वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका, प्यारामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी, ऍम्ब्युलन्स यांना शहर, राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य वाहतुकीसाठी परवानगी राहणार आहे.
या सुविधाही राहणार सुरू
रिझर्व्ह बॅंकेने ठरवून दिलेल्या वेळेनुसार तसेच नियम व अटींसह बॅंका व एटीएम लॉकडाऊनच्या काळात सुरू राहणार असून पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरलाही परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत पेट्रोल पंप, गॅसपंपही सुरू राहणार आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना गॅस व पेट्रोलचा पुरवठा करण्याची अट ठेवण्यात आली आहे. न्यायालयासह सर्व शासकीय कार्यालयेही दहा टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. तसेच यापूर्वी जर लग्न समारंभ, स्वागत समारंभासाठी लॉकडाऊनच्या कालावधीतील परवानगी घेतली असेल तर हे कार्यक्रम या कालावधीतही 20 लोकांपेक्षा कमी उपस्थितीत पार पाडता येणार आहेत.