लॉकडाऊन अंगाशी आला का दारुच्या दुकानांसमोरील रांगांचे हे घ्या परिणाम

0
308

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पुणे, पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन मधील शिथिलता आता चांगलीच अंगलट आल्याचे दिसते. चौथ्या टप्प्यात पुण्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली तर पिंपरी चिंचवड जवळपास ८० टक्के खुले केले आहे. मात्र हीच शिथिलता कोरोनाच्या पथ्यावर पडली आहे. अत्यावश्यक सेवेत किराणा, दूध, भाजी, मेडिकल सुरू होतो तोपर्यंत ठिक होते, कोरोनाचे रुग्ण तुलनेत कमी होते. दारुच्या दुकानांना परवानगी दिली तशी अन्य दुकानदारांनी उचल खाल्ली आणि शासनावर दबाव आणला. उद्योग, व्यापार जवळपास नेहमीप्रमाणेच सुरू झाले. बाजारपेठेतील गर्दी वेगात वाढली आणि त्यासरशी आता कोरोनाचे रुग्ण दुपटीने वाढत चाललेत. पुणे शहरात दिवसाला जिथे ४०-५० रुग्णांची वाढ होती तिथे आता ३०० च्या पटीत रुग्ण वाढत आहेत. पिंपरी चिंचवड रेडझोनमधून बाहेर आले होते, म्हणून व्यवहार सुरू केले तर तिथेही रोज १०-१५ रुग्णांची वाढ एकदम ४५-५० पर्यंत वाढली. पुढे पावसाळा असल्याने परिस्थिती भयंकर असेल असे जाणकार सांगतात. कोरोना रोखायचे तर पुन्हा एकदा १०० टक्के बंद शिवाय पर्याय दिसत नाही, असे राज्यकर्ते आणि प्रशासनाचेही मत आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात रुग्णांनी पाच हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शहरात दिलेली शिथिलता कोरोना वाढीस मदत करते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पुणे शहरातील काही भागात गेल्या चार दिवसांपासून शिथिलता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा हा एक हजारच्या पुढे गेला आहे. तेच चित्र पिंपरी चिंचवड शहरात आहे. इथेही रुग्णांची संख्या तीन दिवसांत २२५ ची थेट ३९२ पर्यंत गेली.

शिथिलता दिल्यानंतर पुणे शहररात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कशी वाढ झाली हे पाहिल्यावर लक्षात येईल. कंसात मृतांचा आकडा आहे. २१ मे – २६५ – (७), २२ मे – ३५८ (१५), २३ मे – २६९ (७), २४ मे – १७९ (७), २५ मे ३९९(१०).एकूण रुग्ण ५,१८१(२६४).

पुणे शहरात जनता वसाहत
दुसरीकडे जनता वसाहतीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जनता वसाहतीत आतापर्यंत ५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्याशिवाय जवळपास २५ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. जनता वसाहतीत आतापर्यंत ९० लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहे. तसेच पालिकेचे वैद्यकीय पथक रोज जनता वसाहतीत जाऊन आरोग्य तपासणी करत आहे. गेल्या १५ मे रोजी जनता वसाहतीत कोरोनाने शिरकाव केला होता. पुणे शहरात सध्या 41 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. ज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. मात्र इतर भागात प्रशासनाने दिलेल्या शिथिलतेमुळे शहरातील कोरोनाला रोखण्यास अनेक अडचणी येत आहेत.

पिंपरीत आनंदनगर मध्ये कहर –
पिंपरी चिंचवड शहरात आनंदनगर या झोपडपट्टीत आता १५० वर नागरिक कोरोना बाधीत झाले आहेत. दहा दिवसांपूर्व अवघे दोन रुग्ण होते आता गेल्या चार दिवसांत रोज १९, ४५, ५० असे एकदम वाढत वाढत गेले. आता ३०० कुटुंबांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरू आहे. या झोपडीपाठोपाठ आता परिसरातील बुध्दनगर, भाटनगर, इंदिरानगर, अण्णासाहेब मगरनगर, लालटोपीनगर अशा परिसरातील झोपड्यांतही बाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. येरवडा भागातून आलेल्या रुगांमुळे झोपडपट्यांतून कोरोनाचा प्रसार झाल्याचे सांगण्यात आले. पिंपरा बाजारपेठेतील गर्दी वाढत गेल्याने अखेर व्यापार बंद करण्याची वेळ आली. शहरात अगदी सर्वसाधारण परिस्थिती असल्यासारखे लोक बाहेर फिरतात, त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतो आहे.