Entertainment

लॉकडाऊनमुळे ‘बॅटमॅन’सह ‘हे’ चार चित्रपट गेले लांबणीवर

By PCB Author

April 21, 2020

करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग सध्या त्रस्त आहे. लोक आपल्या घरातच कैद झाले आहेत. लॉकडाउनमुळे सिनेउद्योग तर पार ठप्पच झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण जगात एकही नविन चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. परिणामी चित्रपटगृह देखील बंद पडली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘द बॅटमॅन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

‘द बॅटमॅन’ हा एक सुपरहिरोपट आहे. येत्या २५ जूनला हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित होणार होता. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे आता थेट पुढच्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. बॅटमॅनसोबतच डीसी युनिव्हर्सचे ‘वंडर वुमन १९८४’, ‘फलॅश पॉईंट’, ‘ब्लॅक अॅडम’ आणि ‘शेजॅम २’ हे चित्रपट देखील पुढे ढकलण्यात आले आहेत.

‘बॅटमॅन’ हा सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या काल्पनिक व्यक्तिरेखेला यंदाच्या वर्षी तब्बल ८० वर्ष पुर्ण झाली. या निमित्ताने वॉर्नर ब्रदर्स प्रोडक्शन कंपनी चाहत्यांसाठी काहीतरही धमाकेदार करण्याचा प्रयत्न करणार होती. त्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. परंतु करोना विषाणूमुळे त्यांचे हे नियोजन अखेर फोल ठरले. हे सर्व चित्रपट आता आपल्याला पुढच्या वर्षी पाहता येतील असे संकेत निर्मात्यांनी दिले आहेत.