Pimpri

लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 262 जणांवर निगडी पोलिसांची कारवाई; तब्बल ‘एवढ्या’ लाखांचा दंड वसूल

By PCB Author

May 12, 2021

निगडी, दि. 12 (पीसीबी) – लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी निगडी पोलिसांनी सोमवारी (दि. 10) विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत नियमभंग करणाऱ्या 262 जणांवर निगडी पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 1 लाख 61 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रावेत ब्रीज कॉर्नर व त्रिवेणीनगर येथे नाकाबंदी लावण्यात आली. त्यात वेगवेगळी पथके तयार करुन ठिकठिकाणी विनाकारण फिरणा-या 72 इसमांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 48 हजार 100 रुपये दंड, मास्क न वापरणाऱ्या 129 इसमांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 64 हजार 500 रुपये दंड, सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणा-या 37 इसमांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 19 हजार 500 रुपये दंड, 20 वाहनांवर कारवाई करुन त्यांच्याकडून सात हजार 100 रुपये दंड, शासकीय आदेशाचे पालन न करता आस्थापना चालू ठेवणा-या चार आस्थापनांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (परिमडंळ 1) मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त (पिंपरी विभाग) डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, अन्सार शेख, विरेद्र चव्हाण, विजयकुमार धुमाळ पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, ताकतोडे व निगडी पोलीस ठाणेकडील पेट्रोलींग पथकाचे पोलीस हवालदार ढोले आणि त्यांच्या पथकाने केली.