लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करणाऱ्या सांगलीकरांचे आभार – जयंत पाटील

0
291

सांगली,दि.६(पीसीबी) – सांगली जिल्ह्यातील काही अपवाद वगळता लोकांनी लॉकडाऊनचे पालन अत्यंत चोखपणे केले, त्याबाबत मी जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानतो. लोकांची कोणतीच गैरसोय होणार नाही. त्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा मिळतील याची काळजी प्रशासन घेत आहे, असं सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत.

इस्लामपूरातील कोरोनाच्या २५ रुग्णांपैकी ४ जणं आता कोरोनामुक्त झाले आहेत. या चारही जणांच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्यात ही सांगली जिल्ह्यासाठी समाधानकारक बाब आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार इतर २१ रुग्णांची प्रकृतीही सुधारत आहे. तेही यातून बाहेर येतील हा मला विश्वास आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १४ एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईलच, मात्र जनतेने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नये. सांगलीत कोरोना आटोक्यात येत असला तरी इतर ठिकाणी आकडे वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. म्हणूनच प्रत्येकाने जबाबदारीने वागा. योग्य अंतर ठेवा, अशा सूचना त्यांनी जनतेला केल्या आहेत.