लॉकडाउन दरम्यान कोणतीही खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये – आयुक्त तुकाराम मुंढे

0
545

 

नागपूर, दि.३० (पीसीबी) – लॉकडाउन दरम्यान कोणतीही खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत, असे केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउ घोषित करण्यात आले आहे. तसंच देशात आणि राज्यात करोनाग्रस्तांचा आकडाही वाढत आहे. या परिस्थिती खासगी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांनी सेवा देणे बंद केल्याच्या काही तक्रारी समोर आल्या होत्या. याव्यतिरिक्त आरोग्यमंत्र्यांनीदेखील अशा परिस्थितीत खासगी डॉक्टरांनी असंवेदनशीलता दाखवू नये असे म्हटले होते

यासंदर्भात मुंढे यांनी रविवारी एक आदेश काढला आहे. लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी खासगी दवाखाने, लॅब, औषधांची दुकानं बंद असल्याचं निदर्शनास आलं आहे. लॉकडाउन लोकांनी बाहेर पडून करोनाचा प्रसार करू नये यासाठी लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या सेवा बंद ठेवण्याचे कारण नाही, असं आदेशात म्हटलं आहे. या सेवा बंद ठेवल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून याबाबत काही तक्रारी मिळाल्या आहे. त्यामुळे या सेवा सुरू ठेवाव्यात असेही यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान या सेवा सुरू न करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असं आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, सर्व संघटनांना त्यांनी हा आदेश पाठवला आहे. सध्या देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. राज्यात याने २०० चा आकडा पार केला आहे. यापैकी १४ जण हे नागपुरातील असल्याचं समोर आलं आहे.