Desh

लूकवरून मुलीला शाळेत चिडवल्याने स्मृती इराणी भडकल्या, इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून म्हणतात…

By PCB Author

June 22, 2019

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला शाळेत चिडवल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. त्यांच्या मुलीला शाळेत अपमानित केल्यामुळे भडकलेल्या स्मृती इराणींनी इंस्टाग्रामवर अत्यंत तिखट भाषेत प्रतिक्रिया दिली आहे.

या पोस्टमध्ये इराणी यांनी म्हटले आहे की, ‘मी काल माझ्या मुलीसोबत टाकलेला एक सेल्फी डिलीट केला आहे.  कारण एक ए झा नावाचा मूर्ख वर्गामध्ये माझ्या मुलीच्या लूकवरुन तिला चिडवत होता. सोबतच तो त्याच्या मित्रांनाही सांगत होता की, तिच्या आईच्या इंस्‍टाग्राम पोस्‍टवर जाऊन लूकवरून तिला अपमानित करा’. महिला, बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे की, माझ्या मुलीने मला पोस्ट डिलीट करायला सांगितल्यामुळे मी डिलीट  केली. मी तिचे ऐकले कारण मी तिच्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत.

पोस्ट डिलीट करण्याच्या निर्णयामुळे चुकीच्या माणसाला ताकतच मिळते, असेही त्यांनी म्हटले आहे.  स्मृती इराणी यांनी आपल्या मुलीच्या यशाच्या गोष्टी सांगत ती स्वतः अशा गोष्टींचा सामना करेल, असेही म्हटले आहे.

इराणींनी म्हटले आहे की, माझी मुलगी एक चांगली खेळाडू आहे. लिम्का बुकमध्ये तिचे रेकॉर्ड नोंदले गेलेले आहे.  कराटेचा ब्लॅक बेल्ट आणि विश्‍व चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळेला कास्यपदक मिळाले आहे. ती खूप प्रेमळ आणि खूप सुंदर आहे, असे स्मृती इराणींनी म्हटले आहे.

तुम्ही कितीही त्रास द्या, ती सक्षमपणे सामना करेल, ती जोइश इराणी आहे आणि मला तिची आई असल्याचा अभिमान आहे, असेही स्मृती इराणींनी म्हटले आहे.