लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक

0
1392

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – लिफ्टचा बहाणा करुन एका दुचाकीस्वाराला निर्जनस्थळी नेत चोरट्याने लुटले. ही घटना शनिवारी (दि.८) पहाटे साडेतीनच्या सुमारास पिंपरी, भिमनगर येथील भाजी मंडईच्या जवळील पुलाखाली घडली.

संतोष नारायण गायकवाड (वय ४०, रा. विजयनगर, डीपीरोड काळेवाडी) असे लुटण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अमर हिरामण दणके (वय २०, रा. बौध्दनगर बिल्डिंग नं.११च्या पाठीमागे, पिंपरी) या चोरट्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास तक्रारदार संतोष गायकवाड हे त्याच्या दुचाकीवरुन पिंपरी रेल्वेस्टेशन येथून काळेवाडी येथील त्यांच्या घरी निघाले होते. यावेळी आरोपी अमर हा लिफ्टच्या बहाण्याने जबरदस्तीने त्यांच्या दुचाकीवर बसला. तसेच त्यांना धमकावून दुचाकी  पिंपरीतील भिमनगर येथील भाजी मंडईच्या जवळील पुलाखाली घेण्यास सांगितली. आणि तेथील अंधाराचा फायदा घेत त्यांच्या खिशातील ५०० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना संतोष यांना आरोपी अमर हा पुन्हा पिंपरी रेल्वेस्टेशन येथे आढळला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली आणि आरोपी अमर याला अटक करण्यात आली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.