लालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार ?  

0
492

 पाटणा, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण बेनामी संपत्ती कायद्याअंतर्गत त्याची १२८ कोटींचा मालमत्ता जप्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पाटण्यातील एक बंगला, दिल्लीतील दोन घरे, एक शेतजमीन आयकर विभागाकडून जप्त होऊ शकते. याबाबत आयकर विभागाने त्यांना नोटीस दिल्याचे समजते.

युपीए सरकारमध्ये लालूप्रसाद रेल्वे मंत्री होते. त्यावेळी त्यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांच्या नावावर कमी किंमतीत ही मालमत्ता गोळा केली होती. त्यानंतर त्यांनी आपली पत्नी राबडीदेवी, आणि मुलांच्या नावावर ही संपत्ती केली होती. दरम्यानच्या काळात या शेल कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला होता. त्यामुळे यांची मुळ मालकी कोणाकडे आहे, याबाबत कोणतेच पुरावे नाहीत.

दरम्यान, या प्रकऱणी बेनामी कायद्यानुसार लालू प्रसाद यादव दोषी ठरल्यास त्यांना सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच त्यांची १२८ कोटींची सर्व संपत्ती जप्त होऊ शकते. दरम्यान, लालू सध्या ९४० कोटींच्या चारा घोटाळ्या प्रकरणी कारावासात शिक्षा भोगत आहेत. आता १२८ कोटींची संपत्ती जप्त झाल्यास त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.