लालबागच्या राजाचे जल्लोशात विसर्जन; २० तासांहून अधिक वेळ रंगली विसर्जन मिरवणूक

0
384

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – उत्सुकता… धाकधूक…. जल्लोष… गुलालाची उधळण… फटाक्‍यांचा कडकडाट… ढोलताशांचा दणदणाट… जयघोष आणि कोठे निराशेची सामसूम…! अशा भावभावनांच्या कल्लोळात मुंबईची शान असलेल्या लालबागच्या राजाचे आज (सोमवारी) सकाळच्या सुमारास विसर्जन करण्यात आले. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल २० तासांहून अधिक वेळ चालली. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर अखेरची आरती घेऊन बाप्पाला अलोट गर्दीच्या साक्षीने गिरगाव चौपाटीच्या खोल समुद्रात निरोप देण्यात आला. निरोपाचा क्षण जवळ आला तसा सर्वांचाच कंठ दाटून आला होता. त्या अवस्थेतही ‘पुढल्या वर्षी लवकर या…’चा घोष आसमंतात घुमत होता. 

परळच्या लालबागमध्ये रविवारी दुपारी १२ वाजता लालबागच्या राजाची आरती घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपारिक वेषातच भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. कुठे ढोलताशांचा दणदणाट… कुठे फटाक्यांची आतषबाजी… तर कुठे गुलालाची उधळण… आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष… अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक सुरू होती. अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेल्या या मिरवणुकीचे फुले वाहून चौकाचौकात स्वागत करण्यात येत होते.

विघ्नहर्त्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बाया-बापडे कुटुंबकबिल्यासह या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’ची डोक्याला टोपी बांधून हजारो गणेश भक्तांनी झांज आणि लेझिमच्या तालात अक्षरश: ठेका धरला होता. ज्या ज्या मार्गावरून लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली तो रस्ता गुलालाने न्हाऊन निघाला होता. संपूर्ण रस्त्यांवर फुलांच्या राशी पसरल्या होत्या. अनेकजण या नयनरम्य मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात मग्न झाले होते, तर काहीजण मिरवणुकीसोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होते. अलोट गर्दीसोबत प्रचंड जल्लोष आणि उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीत भक्त इतके तल्लीन झाले होते की रात्र कधी सरली हेही त्यांना कळले नाही.