Desh

लालकृष्ण आडवाणी व मुरलीमनोहर जोशी यांना निमंत्रण नाही – राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थितांची यादी निश्चित

By PCB Author

August 01, 2020

आयोध्या, दि. १ (पीसीबी) – येत्या पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात. त्यांना निमंत्रण नसल्याचे समजते. राम जन्मभूमी आंदोलनात या दोन्ही नेत्यांनी ९० च्या दशकात महत्त्वाची भूमिका बाजवली होती. निमंत्रण यादी निश्चित झाली आहे, असे वृत्त आहे.

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारने भूमिपूजन कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विस्तृत व्यवस्था केली आहे. कोरोना व्हायरस आणि वयोमानामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि हिंदुत्व चळवळीशी संबंधित असलेले नेते व्हिडीओ कॉन्फरसन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात.

प्रशासनाने व्हिडीओ कॉन्फरसन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या टॉप १० नेत्यांची यादी तयार केली आहे. भूमिपूजन कार्यक्रमाच्यावेळी पंतप्रधान मोदींसोबत अन्य चार नेते मंचावर उपस्थित राहतील असे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत, भाजपा नेत्या उमा भारती, अवधेशानंद सरस्वती, साध्वी ऋतंभरा, रामभद्राचार्य, इकबाल अन्सारी, कल्याण सिंह, विनय कटियार, संघाचे भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबोले, कृष्ण गोपाल, अनिल ओक, लखनौचे प्रचारक अनिल कुमार यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार, दिनेश चंद्र आणि मिलिंद यांच्यासह सहा जणांना निमंत्रण आहे.