Pimpri

लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या नूतन कार्यकारिणीने केला देशी गायींच्या पूजनाने कार्यारंभ

By PCB Author

July 31, 2021

पिंपरी,दि.३१ (पीसीबी) लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या नूतन कार्यकारिणीने चिंचवड येथील केंद्राई गोशाळेला शुक्रवार, दिनांक ३० जुलै २०२१ रोजी भेट दिली. तेथील देशी गायींचे स्वहस्ते पूजन करून तसेच त्यांना चारा खाऊ घालून देशी गायींचे महत्त्व, त्यांच्या दूध, शेणापासून बनविण्यात येणारी औषधे, दुग्धजन्य पदार्थ यासंबंधीची माहिती घेऊन नूतन अध्यक्ष नरेंद्र पेंडसे, मावळते अध्यक्ष मकरंद शाळिग्राम, केबिनेट ऑफिसर प्रदीप कुलकर्णी, विश्वस्त प्रदीप वडगावकर यांनी क्लबच्या वतीने गोशाळेला रुपये ७५०१/- रुपयांचा मदतनिधी गोशाळा प्रमुख धनंजय गावडे यांच्याकडे सुपुर्द केला. तसेच पिंपरी-चिंचवड जलशुद्धीकरण केंद्रातील घनवत प्रकल्पात क्लबच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

त्यानंतर आकुर्डी येथील सीजन बँक्वेटमध्ये लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या नूतन कार्यकारिणीचा शपथविधी संपन्न झाला. लायन्स क्लब मुंबईचे प्रांतपाल राकेश चौमल यांनी नूतन कार्यकारिणीला शपथ देऊन कामाचे स्वरूप, जबाबदारी, प्रभावीपणे काम करण्याची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले. माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते मावळत्या कार्यकारिणीमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे – नरेंद्र पेंडसे – अध्यक्ष प्रसाद दिवाण – सचिव नंदिता देशपांडे – खजिनदार विनय देशपांडे – जनसंपर्क प्रदीप वडगावकर – विश्वस्त संगीता शाळिग्राम – विश्वस्त नरेंद्र प्रभू – विश्वस्त रजनी देशपांडे – विश्वस्त नूतन अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात भरीव सहकार्य, ठाकर समाजातील तरुणांना मासेमारीसाठी जाळी वाटप, व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण इत्यादी प्रस्तावित कामांची माहिती दिली. दीपश्री प्रभू, संगीता शाळिग्राम यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र प्रभू यांनी आभार मानले.