लातूर येथे जम्मू- काश्मीरमधील चार तरुणांना एटीएसने घेतले ताब्यात

0
610

लातूर, दि. १६ (पीसीबी) – जम्मू- काश्मीरमधील चार तरुणांना एटीएसच्या पथकाने (एटीएस) लातूरच्या अहमदपूर आणि उदगीरमधून बुधवारी ताब्यात घेतले.

शब्बीर अहमद (वय २५), अब्दुल रझाक (वय २५), सलील अहमद (वय ४९), इप्तियाज अहमद (वय ३५) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत.

‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेने जम्मू- काश्मीरमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातून चार काश्मिरी तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  नांदेड एटीएसचे पथक बुधवारी जिल्ह्यात पोहोचले असून या चौघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. एका खबऱ्यामार्फत लातूर एटीएसचे प्रमुख कैलास दाबेदार यांना ही माहिती मिळाली होती. या आधारे पोलिसांनी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. या चौघांकडील मोबाइल फोनही पोलिसांनी जप्त केले असून या फोनद्वारे ते कोणाच्या संपर्कात याचा तपास सुरु आहे. सर्व संशयित हे जम्मू- काश्मीरमधील पूंछ जिल्ह्याचे रहिवासी आहेत. धर्मासाठी पैसे गोळा करण्यासाठी रेल्वे मार्गाने नांदेड आणि तिथून लातूर जिल्ह्यात पोहोचलो, असे या तरुणांनी पोलिसांना सांगितले आहे. यातील दोघे जण यापूर्वीही लातूर जिल्ह्यात येऊन गेल्याची माहितीही समोर आली आहे.