लातूरमध्ये गतिमंद मुलीवर परप्रांतीयाकडून बलात्कार; आरोपीला बेड्या  

0
452

लातूर, दि. ९ (पीसीबी) – शिरुरअनंतपाळ तालुक्यातील शिराळा वांजरवाडा गावात एका परप्रांतीयाने गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. घरात गतिमंद मुलगी एकटीच असल्याचे हेरत त्याने बलात्कार केला. मुलीने नातेवाईकांना ही घटना सांगितल्यावर शिरुर अनंतपाळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महंमद कुरेशी (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा राहणारा असून महंमद हा मिक्सर विकण्याचे काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद कुरेशी मिक्सर विकण्यासाठी शिराळा वांजरवाडा वस्तीवर आला होता. त्यावेळी त्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. घरी कोणी नसल्याचे पाहून या नराधमाने गतिमंद मुलीवर अत्याचार केला. यानंतर हा नराधम तिथून पळून गेला. हा सर्व प्रकार मुलीने नातेवाईकांना सांगितल्यानंतर, हे प्रकरण उजेडात आले.

 

या घटनेची माहिती फोनवरुन सर्वत्र देण्यात आली. मग मिक्सर विकणाऱ्या तरुणास पकडण्यात आले.  आरोपीला पीडित मुलीसमोर आणले असता, मुलीने त्याला ओळखले. त्यानंतर आरोपीला शिरुर अनंतपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस तपास करत आहेत.