Maharashtra

लाडक्या सरांना अखेरचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर

By PCB Author

January 03, 2019

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर आज (गुरूवार) शोकाकुल वातावरणात शिवाजी पार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी आचरेकर सरांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी लाडक्या सरांना निरोप देताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर झाले होते.

आचरेकर सरांनी ज्या शिवाजी पार्क मैदानातील खेळपट्टीवर क्रिकेटपटू घडवले, त्याच ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी शिवाजी पार्क मैदानात सराव करणाऱ्या लहान क्रिकेटपटूंनी बॅट उंचावत त्यांना अखेरचे अभिवादन केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आचरेकर सरांची अंत्ययात्रा काढण्यात आली. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित या शिष्यांनी सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. दुपारी बारा वाजता आचरेकरांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला.