लाज असेल तर उद्धव ठाकरेंनी बॅनर हटवायला स्वत: यावं – अंजली दमानिया

0
2169

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मुंबईमध्ये मागील आठवडाभरापासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली खंबाटा एव्हिएशनच्या कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज वेगळे वळण लागले आहे. खंबाटा एव्हिएशन प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या कामगारांनी दमानियांच्या नेतृत्वाखाली ९ ऑक्टोबरपासून (गुरुवार) सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच इतर नेत्यांचा फोटो असलेले रावणाच्या अवतारातील पुतळ्याचे बॅनर लावण्यात आले. या बॅनरची लाज वाटत असेल तर स्वत: उद्धव ठाकरे यांनी बॅनर हटवायला यावे, असे आव्हानच दमानिया यांनी या बॅनरचा फोटो ट्विट करत दिले आहे.

 

दमानिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी खंबाटा कामगारांना न्याय मिळून देण्याचे आश्वासन देणाऱ्या नेत्यांना आता बॅनर लागल्यावर का लाज वाटत आहे, असा सवाल केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, “आता का लाज वाटते? कामगारांचे पैसे खातांना लाज नाही वाटली? कामगारांसाठी BKS union लढली नाही, नुसती आश्वासन? २७०० कुटुंबांना वाऱ्यावर सोडले?, आज सकाळपासून पोलिस म्हणताहेत की आंदोलनाच्या ठिकाणाहून हा बॅनर हटवा. आम्ही हट्वणार नाही. उद्धव ठाकरेंना लाज वाटत असेल तर बॅनर हलवायला स्वतः यावे.” या फोटोत दिसत असणाऱ्या बॅनरमध्ये रावणाच्या तोंडाऐवजी वेळोवेळी आश्वासन देणाऱ्या नेत्यांचे चेहरे लावण्यात आले असून त्यावर ‘आई जगदंबा यांना सत्बुद्धी देवो…’ अशी ओळ लिहीण्यात आली आहे.

दोनच दिवसापूर्वी राज्याचे कौशल्य विकास आणि कामगार विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बैठकीची तयारी दर्शवली होती. मात्र ही बैठक अयशस्वी ठरल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा देत कामगार प्रतिनिधी आणि दमानिया यांनी या बैठकीला उपस्थिती लावली. या संदर्भातील ट्विट स्वत: दमानिया यांनी केले होते.