लाकूड विसरा आता बांबूपासून बनवा बॅट

0
337

लंडन, दि.११ (पीसीबी) : क्रिकेट बॅटच्या निर्मितीपासूनच हा खेळ खर्चिक असल्याचे कळून चुकते. आतापर्यंत बॅट या ‘विलो’ पासून बनवल्या जात होत्या. पण, आत जर कुणी म्हणाले की बॅट बांबूपासूनही बनवली जाऊ शकते, तर आश्चर्य वाटायला नको. केंब्रिज विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांनी बांबूपासून बॅट बनवणे शक्य आहे आणि त्यामुळे बॅट उत्पादन व्यवसायाला एक प्रकारे आर्थिक स्थिरता मिळू शकणार आहे.

आतापर्यंत क्रिकेट बॅट पारंपरिक पद्धतीने म्हणजे इंग्लिश किंवा कश्मिरी विलोपासून बनवल्या जातात. अर्थातच, आर्थिक गणित खूप महाग पडते. पण, बांबूपासून बॅट बनवणे हा याला स्वस्त पर्याय होऊ शकतो, असे दर्शिल शहा आणि बेन टिनक्लेर डेव्हिस यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या अभ्यासावरून निदर्शनास आले आहे.

बांबूपासून बनवलेल्या बॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यॉर्करवर देखिल सहज चौकार मारू शकाल . तसेच क्रिकेटमधील सर्व फटके तुम्ही सहज खेळू शकाल , असा दावा शहा यांनी केला आहे.

गार्डियन न्यूज पेपरमध्ये आलेल्या वृत्तानुसार बॅट बनविण्यासाठी आता इंग्लिश विलोचा पुरवठा करणे कठिण झाले आहे. झाड लावल्यानंतर जवळपास १५ वर्षांनी त्याचे लाकूड वापरता येते. त्यानंतर नव्याने झाडांची लागवड करावी लागते. एक बॅट बनवताना १५ ते ३० टक्के लाकूड वाया जाते. ही सगळी प्रक्रिया खर्चिक आहे. त्यालाच आता बांबूपासून बॅट निर्मितीच्या शोधाने छेद गेला आहे.

बांबूपासून बॅट बनवणे अधिक स्वस्त आणि सहज आहे. बांबूची वाढ ही झपाट्याने होत असते. त्यामुळे बांबू झटपट मिळणे शक्य होते. आधीच्या बांबूपासूनच दुसऱ्याची निर्मिती होती आणि याला साधारण सात वर्षाचा कालावधी जातो. चीन, जपान, दक्षिण अमेरिका अशा देशात क्रिकेट घेऊन जाण्यासाठी बांबूपासून बॅटची निर्मिती हा चांगला पर्याय ठरू शकतो, असेही शहा यांनी आपल्या अभ्यासात म्हटले आहे.

बांबूच्या एकत्र स्ट्रीपपासून काही थरांमध्ये ते चिकटवून बॅटचे नमुना ब्लेड तयार केल्याचे ‘स्पोर्टस इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात त्यांनी म्हटले आहे. संशोधकांच्या मते या बॅट इतर विलोपासून बनविण्यात आलेल्या बॅटपेक्षा मजबूत आणि भक्कम आहेत आणि विलोच्या बॅटनेच खेळत असल्याचा जाणवते. फटका मारल्यावर येणारा आवाज हा अगदी सध्याच्या बॅटने फटका मारल्यावर येतो अगदी तसाच येतो असेही या संशोधकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे विलो बॅटपेक्षा या बॅट जड राहणार आहेत.

बांबूच्या बॅटची कल्पना नक्कीच चांगली आहे. क्रिकेट सुरू करणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. पण, ही बॅट आयसीसीच्या नियमात बसते की नाही हे अजून स्पष्ट नाही. कारण, आयसीसी केवळ लाकडापासून बनवलेल्या बॅटला मान्यता देते. मात्र, या बॅटच्या निर्मितीवरून विविध मत प्रवाह आहेत. अभियंता आणि पदार्थ विज्ञान तज्ज्ञ प्रा. मार्क मिओडोविक यांच्या मते, ही कल्पना चांगली आहे. पण, केवळ बांबू विलोपेक्षा सहज उपलब्ध होऊ शकतो या एका कारणाने बांबूपासून बनवलेल्या बॅट याअधिक उपयुक्त ठरतात असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. बांबूच्या निर्मितीपासून त्यापासून बॅट बनविण्याच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा अभ्यास व्हायला हवा, तर या संशोधनाला भक्कम पाया मिळेल. अन्यथा, ही नवी कार्यपद्धती ‘एलबीडब्ल्यू’ होईल.