लाईट बंद करून दिवे लावा, टाळ्या वाजवा हे कुठ पंतप्रधानांच काम आहे का ?’ – बाळासाहेब थोरात

0
723

 

मुंबई, दि.३ (पीसीबी) – आज लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले आहे.

यासोबतच, येत्या रविवारी ५ एप्रिलला जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावं म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली आहे. ती म्हणजे, रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदींच्या या आवाहनावर टीका केली आहे. आपली भूमिका त्यांनी एका मराठी वृत्त वाहिनीवर मांडली आहे. ते म्हणाले,

‘कोरोनाच संकट अधिक गंभीर होत आहे. तेव्हा आपले पंतप्रधान आधी टाळ्या वाजवायला सांगितलं, आत्ता दिवे लावायला सांगताय. कधी हे पंतप्रधान असल्यासारखं वागणार आहेत का ? देशाचे प्रमुख म्हणून कधी निर्णय घेणार आहेत का ? एकंदर आज गरज आहे निरनिराळे मेडिकल ईक्वीपमेंट पुरवण, राज्यांना जास्तीत जास्त मदत करण, नागरिकांना धीर देण. हे सोडून दिलं न आता लाईट बंद करून दिवे लावा, टाळ्या वाजवा हे कुठ पंतप्रधानांच काम आहे का ?’ अश्या शब्दात थोरात यांनी मोदींवर टीका केली.