लांबलेल्या ऑलिंपिकच्या तयारीस नव्याने सुरवात

0
202

टोकियो, दि.२३ (पीसीबी) : करोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या ऑलिंपिकच्या तयारीला संयोजकांनी पुन्हा एक वार नव्याने सुरवात केली आहे. करोनामुळे ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. लांबणीवर पडलेल्या या स्पर्धेला सुरवात होण्यास आता २१२ दिवस बाकी आहेत. उलट गणतीस सुरवात झाली असली, तरी आयोजनाच्या दृष्टिने कामास तशी सुरवात नव्हती. मात्र, आता खर्च वाढला असला, तरी आयोजकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यांनी नव्याने तयारीला सुरवात केली आहे.

कामाला सुरवात केल्यावर आयोजकांनी पहिल्या टप्प्यात उदघाटन आणि समारोप सोहळ्यासाठी नव्या समितीची नियुक्ती केल्याचे जाहिर केले. आता या दोन्ही सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी या नव्या समितीवर असेल. यापूर्वी जबाबदारी असलेल्या समितीमधील सात दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या हिरोशी सासाकी यांना या नव्या समितीचे प्रमुख केले आहे. सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. कामात म्हणावी तशी प्रगती नाही हे मी कबूल करतो. त्यामुळेच हे दोन्ही सोहळे यशस्वी करण्यासाठी नव्याने नियोजन करावे लागणार आहे. दोन्ही सोहळे साधेपणाने सादर करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

धोका कायम
ही स्पर्धा खरे, तर या वर्षी उन्हाळ्यात होणार होती. मात्र, करोना संकटकालामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे बहुतेक सर्वच क्रीडा स्पर्धांचे आंतरराष्ट्रीय नियोजन विस्कळीत झाले. आर्थिक गणितही बिघडले आहे. त्यामुळे संयोजक आणि सरकार यांनी खर्चास कात्री लावण्यास सुरवात केली आहे. स्पर्धा खेळाडू, प्रेक्षकांसाठी सुरक्षित आणि साधेपणाने घेण्याचा निश्चय आयोजकांनी केला आहे. त्यात करोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. टोकियोमध्ये सातत्याने रुग्णांची संख्या वाढतच आहे. आत्ताच ही संख्या दहा हजाराच्या वर गेली आहे. त्यामुळे स्पर्धा होणार की नाही, खर्च करायचा की नाही, तयारी ठेवायची की नाही या सगळ्याबाबत डोक्यावर टांगती तलवार आहेच.