Desh

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा; केंद्र सरकार करणार कायद्यात बदल

By PCB Author

April 13, 2018

१२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करेल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे. यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) बदल केला जाईल, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

कठुआमधील आठ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा देणारा कठोर कायदा करावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोस्को अॅक्टमध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले. सध्या पोस्को अॅक्टमध्ये जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होते. यात बदल करुन मृत्यूदंडाच्या शिक्षेचाही समावेश केला जाईल, असे सांगितले जाते.

‘कठुआमधील बलात्काराच्या घटनेने मला देखील मानसिक धक्काच बसला. आम्ही पोस्को अॅक्टमध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या तरतुदीची शिफारस करु, असे त्यांनी सांगितले. लवकरच या संदर्भातील प्रस्ताव कायदा मंत्रालयाला पाठवला जाईल, असे महिला व बालविकास खात्याचे सचिव राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले. ‘सध्या संसदेचे अधिवेशन सुरु नाही. त्यामुळे केंद्र सरकार सुधारित कायद्यासाठी अध्यादेश जारी करु शकते, असेही त्यांनी सांगितले.