Maharashtra

लहानपणी शरद पवारांच्या गाडीमागे धावायचो, आता राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार – अमोल कोल्हे

By PCB Author

March 02, 2019

मुंबई, दि. २ (पीसीबी) – मी लहान असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीच्या पाठीमागे धावायचो आता राष्ट्रवादीला अधिक बळकट करण्यासाठी आणि सत्तेत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे, अशी भावना प्रसिध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. 

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी (दि. १) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते व आमदार छगन भुजबळ,  अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर कोल्हे पत्रकाराशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्यामध्ये देशाच्या राजकारणाला सकारात्मक आणि विधायक दिशा देण्याची क्षमता, जाण आणि जाणीव आहे, त्यांच्या नेतृत्वात काम करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो.  राष्ट्रवादीत प्रवेश करून आनंद होत आहे, असेही डॉ.अमोल कोल्हे म्हणाले .

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यापूर्वी शिवसेनेमध्ये होते. ते शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख होते. छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेमुळे  ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत. या भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता वाढली. याचा राष्ट्रवादीला कितपत फायदा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.