‘लसीकरणाबाबत भाजपने कांगावा थांबवावा, प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावेत’

0
218

– राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचे परखड मत

– पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर ग्लोबल टेंडर काढण्याचे नियोजन करावे

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत वेळोवेळी केंद्र सरकारने घेतलेले धोरणात्मक निर्णय चुकले. त्यामुळे देशभरात लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. या परस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपकडून लसीकरणावरून केवळ निर्णय घेतल्याचा, राज्य सरकारकडे परवानगी मागितल्याचे सांगून कांगावा सुरू आहे. प्रत्यक्षात महानगरपालिका पातळीवर ठोस काही केले जात नाही. पुणे महानगरपालिकेने लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावेत, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी मांडले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात लसीकरणाचे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण देशात १६ जानेवारी २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. कोरोना परिस्थीती हातळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले, ही बाब वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. त्या नंतर लसीकरणाबाबत केंद्र सरकारच्या नियोजनातीत त्रुटींमुळे देशातील लसीकरण मोहिमेचाही बोजवारा उडाला आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात नस पुरवठा होत नसतान केंद्र सरकारने १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याची घोषणााा करून टाकली. त्यासाठी पुरेशा प्रमाणात लस दिली जात नाही. पिंपरी-चिंचवड शहरात लसीकरणाची हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. महानगरपालिकेला पुरेशा प्रमाणात नस पुरवठा होत नाही त्यामुळे लसीकरण केंद्रे वारंवार बंद करण्याची वेळ महानगरपालिका प्रशासनावर येत आहे.

या परिस्थितीत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपकडून लसीकरणाच्या निमित्ताने नुसता कांगावा करण्याचा प्रकार सुरू आहे. लस उत्पादक कंपन्या, लस पुरवठ्याबाबतचे केंद्र शासनाचे जाहीर केलेले धोरण, महानगरपालिकेच्या मर्यादा याचा कोणताही विचार न करता महानगरपालिका स्थायी समितीने थेट पध्दतीने लस खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्या संदर्भात कोणताही निर्णय; झालेला नसताना भाजपच्या पदाधिकार-यांनी थेट १५ लाख लसी खरेदी करण्याची घोषणा केली. लसपुरवठा करण्याची साखळी ही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन अशी आहे. तरी देखील काही दिवसांपूर्वी शहराला थेट केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस पाठविल्याचे सांगून त्यांचे आभार शहरातील मंडळींनी मानले होते. आता ज्यावेळी शहराला लसींची गरज आहे. त्यावेळी सत्ताधारी भाजपचे शहरातील आमदार, पदाधिकारी राज्य सरकारकडे लस पुरवठ्यासाठी बोट दाखवत आहे. भाजपने लसीकरणाबाबतचा कांगावा थांबवावा आणि पिंपरी-चिंचवडकरांची दिशाभूल करू नये.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेकडून लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेने लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची प्रक्रिया करावी. प्रशासनाने ठोस उपाययोजना करून शहरवासीयांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे संजोग वाघेरे पाटील यांनी सुचविले आहे.