लष्कर-ए-तोयबाचे ६ दहशतवादी तामिळनाडूत; हाय अलर्ट जारी

0
668

तामिळनाडू, दि. २३ (पीसीबी) – लष्कर-ए-तोयबाचे ६ दहशतवादी सागरी रस्त्यामार्गे तामिळनाडूत शिरल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांकडून संपूर्ण राज्यात कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. दरम्यान, ही माहिती मुख्यत्वे कोईंबतूरसाठी असल्याचं, एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं.

गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना हा अलर्ट पाठवण्यात आला. तामिळनाडूमध्ये शिरलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी आणि पाच श्रीलंकेतील तमिळ मुस्लीम असल्याचे पाठवण्यात आलेल्या अलर्टमध्ये नमूद करण्यात आले. तसेच त्यांनी हिंदूंचा पेहराव केला असून ते राज्यभरात दहशतवादी कारवायांच्या तयारीत असल्याचेही म्हटले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार ते दहशतवादी संरक्षण संस्था, मंदिर, पर्यटन स्थळ आणि परदेशी दुतावासावर हल्ला करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.