Desh

लडाख मध्ये परिस्थिती पुन्हा बिघडण्याच्या मार्गावर? चीनची आता फिंगर फोर पर्यंत घुसखोरी….

By PCB Author

July 16, 2020

लडाख,दि.१६(पीसीबी) : भारत चीन संबंध हे खूपच तणावग्रस्त आहेत. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये तणाव वाढू शकतो. सध्या दोन्ही देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पूर्व लडाखमध्ये एकूण चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आले होते. त्यातल्या तीन ठिकाणी चिनी सैन्य माघारी फिरले आहे. पण पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळील फिंगर ४ वरुन मागे हटण्यास चीनने नकार दिला आहे.

चीनच्या या हट्टी भूमिकेमुळे पुन्हा एकदा संघर्षाची स्तिथी पुन्हा निर्माण होऊ शकते. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कुठलीही आक्रमकता दाखवल्यास त्यांना लगेच प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने पूर्व लडाखच्या सीमेवर रणगाडयांची तैनाती वाढवली आहे. अजून धोका टळलेला नाही. भारतीय सैन्य पूर्णपणे हायअलर्टवर आहे..

कॉर्प्स कमांडरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तब्बल १५ तास चर्चा झाली. मंगळवारी सकाळी सुरु झालेली ही बैठक बुधवारी मध्यरात्री संपली. या बैठकीत फिंगर ४ वरुन मागे हटणार नसल्याचे चिनी सैन्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गलवान खोरे, हॉट स्प्रिंग आणि ग्रोगामधुन मागे फिरण्यावर भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाख, जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर १७ आणि १८ जुलैला जाणार आहेत. उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी दिल्लीत दाखल झाले आहेत. ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन नियंत्रण रेषेजवळील परिस्थितीची माहिती देतील.

चीनने फिंगर फोरमधुनही मागे हटावे ही भारताची मागणी आहे. एप्रिलच्या मध्यामध्ये जी स्थिती होती, तशी जैसे थे परिस्थिती पूर्ववत करा, असे भारताचे म्हणणे आहे. आता फिंगर एरिया कळीचा मुद्दा बनला आहे. आधी भारतीय सैन्य फिंगर आठ पर्यंत गस्त घालायचे. पण चिनी सैन्याने आता फिंगर फोर पर्यंत घुसखोरी केली आहे. चीनने पूर्वीप्रमाणे फिंगर आठ पर्यंत मागे फिरावे ही भारताची मागणी आहे. चीनच्या या अशा वागण्यामुळे पुढच्या काही दिवसात स्थिती आणखी बिघडू शकते.