Desh

लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं – नरेंद्र मोदी

By PCB Author

July 03, 2020

देश,दि.३(पीसीबी) – लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांचे कौतुक केलं आहे. आज मोदींनी अचानक लेह लडाखचा दौरा केला. सीमेवरील सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

गलवान खोऱ्यातील जवांनाच्या शौर्याचा देशाला अभिमान आहे. मी कोणताही संरक्षणात्मक बाबीने विचार करताना किंवा निर्णय घेताना प्रथमत: 2 मातांचा विचार करतो. एक म्हणजे भारतमाता आणि दुसरा म्हणजे तुम्हा जवानांच्या वीरमाता. तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी गलवान खोऱ्यामध्ये जी वीरता आणि शौर्य दाखवलं, त्याने संपूर्ण जगाला भारताची ताकद काय आहे? हे दाखवून दिलं आहे. भारत जल, वायू आणि जमीन सर्व ठिकाणी शक्तीमान आहे. जवानांच्या हातात देश सुरक्षित असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली.

दरम्यान, भारतीय सैनिकांचं समर्पण हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठीण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातल्या कशाचीच होऊ शकत नाही. मी याचा आज अनुभव घेतोय आणि माझ्या डोळ्यांनी हे सगळं बघतोय, असं मोदी म्हणाले.