Maharashtra

लघुशंकेसाठी मोटरमनने थांबवली ट्रेन

By PCB Author

July 18, 2019

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – एकीकडे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असतानाच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गावर एक अजबच प्रकार घडला. कोणताही बिघाड नसताना मोटरमनने गाडी थांबवली. मोटरमनला लघुशंका आल्याने त्याने चक्क मध्येच गाडी थांबवल्याचा प्रकार घडला. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, रेल्वेने हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत हे नैसर्गिक कृत्य असल्याचे सांगत यावर कारवाईची तरतूद नसल्याचे म्हटले आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर दरम्यान अचानक थांबली. त्यानंतर मोटरमनने उतरून रुळावर लघुशंका केली. परंतु याचवेळी एकाने मोटरमनला लघुशंका करताना पाहिले आणि त्याचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये मोटरमन ट्रेन थांबवून रेल्वे रूळांवर लघुशंका करताना दिसत आहे. त्यानंतर पुन्हा तो आपल्या केबीनमध्ये जाऊन गाडी सुरू करतो. सिग्नल नसतानाही अचानक गाडी थांबवली असल्याने प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. परंतु कोणत्याही प्रवाशाने याबाबत तक्रार केली नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, हे नैसर्गिक कृत्य असल्याचे सांगत यावर कारवाईची तरतूद नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.बुधवारी मध्य रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन उशीराने धावत होत्या.