लग्न मोडल्याचा मनात राग, भल्या पहाटे आईसह मुलीचं अपहरण; पुढे काय?

0
174

नागपूर, दि. 1३ (पीसीबी):जमलेले लग्न मोडल्याचा राग धरत मुलीचे आईसह अपहरण केल्याची घटना घडली आहे. नागभीड तालुक्यातील पाहर्णी गावात हा प्रकार घडला. अपहरण करणाऱ्या तरुणाचे नाव रामकृष्ण भोयर असून आई आणि मुलीचे अपहरण करण्यासाठी त्याने 5 मित्रांची मदत घेतली. मुलाची वागणूक चांगली नसल्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी लग्न मोडले होते. चंद्रपूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुही तालुक्यातील रूयाळ या गावामधील रामकृष्ण भोयर या तरुणाचे पाहर्णी गावातील एका मुलीशी लग्न जुळले होते. मात्र, मुलाची वागणूक नीट नसल्याचे कारण देत मुलीच्या घरच्यांनी हे लग्न मोडले. याच गोष्टीचा राग धरत मुलाने त्याच्या मित्रांच्या मदतीने मुलीचे तिच्या आईसह अपहरण करण्याचे ठरवले. त्याने आपल्या 5 साथिदारांच्या मदतीने मंगळवारी (12 जानेवारी) सकाळी पहाटेच आई आणि लग्न जुळलेली मुलगी अशा दोघींचे पाहर्नी गावातून अपहरण केले.

आई आणि मुलगी या दोघीही गायब असल्यामुळे पाहर्नी गावात खळबळ उडाली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी नागपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत बायको आणि मुलगी गायब असल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच प्रकरणाचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तपासाला तत्काळ सुरुवात केली. त्यासाठी चंद्रपूर ग्रामीण पोलिसांनी नागपूर पोलिसांचीसुद्धा मदत घेतली. कसून चौकशी आणि सूत्रांच्या माहितीच्या आधारे मुलींचे अपहरण करणारा आरोपी रामकृष्ण भोयर याचा पोलिसांना शोध लागला. तो नागपूर-मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला केळझर येथून तत्काळ अटक केली.

दरम्यान, लग्न मोडल्याचा राग धरत चक्क मुलीचे तिच्या आईसह अपहरण केल्याच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी आरोपी रामकृष्ण भोयार आणि इतर दोन आरोपींना अटक केली असून त्याचे इतर 3 साथीदार फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.