Desh

लग्न झालेल्या महिला लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा आनंदी – आरएसएस

By PCB Author

September 16, 2019

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा लग्न झालेल्या महिला या खूपच अधिक प्रमाणात आनंदी असतात, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आला आहे. महिलांसंदर्भात अभ्यास करणाऱ्या पुण्यातील संघाशी संलग्न ‘दृष्टी स्त्री अध्यासन प्रबोधन केंद्रा’च्या एका सर्वेक्षणातून हे निष्कर्ष समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.

महिलांविषयीच्या ‘स्टेट्स ऑफ विमेन’ नामक या सर्वेक्षण अहवालाचे येत्या २४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या प्रकाशनानंतर समाजातील महिलांच्या स्थितीशी संबंधित विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हावी यासाठी टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी प्रकाशन करण्यात येणार आहे. राजस्थानमधील पुष्कर येथे सुमारे तीन डझन संघाशी संलग्न संघटनांच्या ‘समन्वय बैठकीत’ या सर्वेक्षणातील निष्कर्षांवर चर्चा झाली. ‘दृष्टी’च्या प्रतिनिधींनी यावेळी एक सादरीकरण केले ज्यामध्ये सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्ष समोर मांडण्यात आले.

या सर्वेक्षण अहवालात म्हटल्याप्रमाणे, लग्नामुळे महिलांना स्थिरता येते तसेच संबंधित महिलेचा अत्युच्च आनंद आणि कल्याणात वाढ होते. महिलांची मिळकत आणि आनंद याचा परस्पर संबंध नसल्याचेही या सर्वेक्षणातील निष्कर्षांमध्ये म्हटले आहे. जवळपास सर्व प्रकारची कामे करणाऱ्या महिलांमध्ये ही बाब सारखीच असून अध्यात्मिक क्षेत्रात समर्पित असलेल्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न नसतानाही त्या सर्वोच्च पातळीवरील आनंद अनुभवत असल्याचेही यात म्हटले आहे. तसेच आनंद आणि कल्याणाच्या पातळीमध्ये सर्वाधिक टक्केवारी पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी स्तरावरील स्त्रियांमध्ये दिसून आली असून सर्वात कमी टक्केवारी निरक्षर महिलांमध्ये दिसून आल्याचा दावाही यातून करण्यात आला आहे.