लग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर  

0
768

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – ‘माझा विवाह होत नाही, मी ‘एचआयव्ही’   ग्रस्त आहे, मला विवाह करायचा आहे. त्यासाठी मुलगी पाहा,’असे एक तरूण रावेत येथील एका ५० ते ६० फुटांच्या क्रेनवर चढून ओरडून सांगत होता. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांसह पोलीस , अग्निशमन दलाचे  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित व्यक्तीला तुझे लग्न लावून देतो, असे सांगितल्यानंतर त्याला खाली उतरवण्यात आले.

मूळचा नांदेडमधील कंधार येथील रहिवासी असलेली ही व्यक्ती नाशिक येथून पिंपरी-चिंचवड येथे कामानिमित्त आली होती. नाशिक येथे १५ दिवस काम केल्यानंतर मिळालेल्या पैशातून तो पिंपरी-चिंचवड शहरात आला. विवाह होत नसल्याचे तो निराशेत होता. वयाच्या २० व्या वर्षी त्याला एचआयव्हीची लागण झाल्याने त्याचा विवाह होत नव्हता. कुटुंबातील व्यक्तीही आपले म्हणणे ऐकून घेत नाहीत. यामुळे तो तणावाखाली होता. त्यामुळे आपल्याला विवाह करायचा आहे हे सांगण्यासाठी तो चक्क उंचच्या उंच क्रेनवर चढला. यावेळी तो उंचावरुन ‘माझा विवाह होत नाही, मी एचआयव्ही ग्रस्त आहे, मला विवाह करायचा असून त्यासाठी मुलगी पाहा’असे तो ओरडून सांगत होता.

दरम्यान त्याला खाली घेतल्यानंतर मला आत्महत्या करायची नव्हती, परंतु माझ्या भावना कोणी ऐकून घेत नव्हते. त्यामुळे मला हे कृत्य करावे लागल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याच्या या कृतीमुळे पोलिसांची चांगलीच पाचावर धारण बसली होती.