Maharashtra

लग्नाला नकार देणार्‍या प्रेयसीची सोशल मिडियावर बदनामी!

By PCB Author

May 27, 2021

अहमदनगर, दि. २७ (पीसीबी) – लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरुन तरुणीची सोशल मिडियावर बदनामी करत तिच्यासह तिच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार भिंगारमध्ये घडलाय. याप्रकरणी देण्यात आलेल्याफिर्यादीनुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रोहित जालिंदर पाटोळे (रा. फराहबाग ता. नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, पाटोळे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करुन भिंगार पोलिसांच्या ताब्यात दिलंय. रोहित पाटोळे आणि भिंगारमधील एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. दररम्यानच्या काळात ते फिरायला गेल्यानंतर पाटोळे याने त्या तरुणीचे काही फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. प्रेमसंबंध असल्याने पाटोळे याने संबंधित तरुणीला लग्नाची मागणी घातली. लग्न करण्यास तरुणीने नकार दिला. याचा राग आल्याने पाटोळे याने संबंधित तरुणीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवर पाटोळे याने संबंधित तरुणीचे फोटो व्हायरल केले. यानंतर त्या तरुणीने भिंगार पोलीस ठाण्यात पाटोळे विरोधात फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी करुन आरोपी पाटोळे याचा शोध घेतला. तो पुणे जिल्ह्यातील येरवडा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना समजली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पोलिसांनी पाटोळेच्या मुसक्या आवळत त्याला भिंगार कँप पोलिसांच्या हवाली केले.