लग्नाला केवळ 20 वऱ्हाड्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी

0
359

पुणे,दि. १२ (पीसीबी) : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने 50 वऱ्हाड्यांमध्ये लग्न लावण्याची मुभा दिली. पण पुण्याच्या जुन्नर तालुक्यात हा नियम बदलण्यात आलाय. इथं केवळ 20 वऱ्हाड्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. कारण इथं पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यासह 35 हून अधिक वऱ्हाड्यांना कोरोनाची लागण झालीये. त्यामुळे वर-वधूच्या गावांसह सात गावं सील करण्यात आलीत. परिणामी हजारो ग्रामस्थ कोरोनाच्या धास्तीत आहेत.

जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुकमधील मुलाचे धालेवाडीतील मुलीशी नुकताच विवाह झालाय. वर-वधू एकाच तालुक्यातील असल्याने या विवाहात 50 वऱ्हाड्यांची परवानगी धुडकवली गेली. आसपासच्या गावातील पै-पाहुणे आणि मित्र मंडळीच्या मोठ्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला. नियमांचा भंग इथंच थांबला नाही तर हिवरे बुद्रुकमध्ये रात्री डीजेच्या तालावर वरातही निघाली. हिवरे बुद्रुक हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांचे, पण बेनकेंच्या कानापर्यंत डीजेचा दणदणाट पोहचलाच नाही. माझं गाव असलं तरी सध्या मी नारायणगावमध्ये वास्तव्यास असल्यानं गावात नेमकं काय घडलं हे मला माहित नव्हतं, असं आमदार बेनकेंचं यावर म्हणणं आहे. तोपर्यंत दणक्यात वरात पार ही पडली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे नियम डावलून विवाह सोहळा आणि वरात काढण्याचे परिणाम अखेर अनेकांना भोगावेच लागले. विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. मग काय सर्वांचेच धाबे दणाणले. जे घडू नये अशी अपेक्षा होती ते घडत गेलं. तालुक्यातील रोजच्या अहवालात विवाह सोहळा आणि वरातीला उपस्थित असणाऱ्यांची संख्या वाढू लागली. नववधू-वर, आई-वडील, पै-पाहुणे, मित्र-मंडळी असे उपस्थित 35 पेक्षा जास्त वऱ्हाडी आजवर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. संपर्कात आलेल्या इतरांची ही तपासणी अद्याप होणं बाकी आहे. परिणामी हिवरे बुद्रुक, धालेवाडी, धनगरवाडी, वडगाव सहाणे, शिरवली, तेझेवाडी, किकेकरवाडी ही गावं कंटेन्मेंट म्हणून सील करण्यात आलीत.