रोहित शेखर तिवारींचा गळा दाबून खून केल्याचा संशय; सीआयडी तपास करणार  

0
773

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर तिवारी यांचा गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरुन मृत्यू झाला असावा, असा अंदाज  शवविच्छेदन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे.  या प्रकरणी रोहित शेखर यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोहित शेखर हे दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहात होते. रोहित शेखर तिवारी यांचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला होता. मॅक्स रुग्णालयामध्ये त्यांना  आणण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच ते मरण पावल्याचे घोषित करण्यात आले होते.

रोहीत यांचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. यात त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे.  रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरुन झाल्याचा निष्कर्ष  अहवालामध्ये काढण्यात आला आहे.  हा अनैसर्गिक मृत्यू असून तो मनुष्यवध वर्गवारीतील आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. या आधारे दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सीआयडीकडे सोपवला आहे.