Desh

रोहित शर्मा, धोनीमुळे विराट यशस्वी कर्णधार- गंभीर

By PCB Author

September 20, 2019

अहमदाबाद, दि. १९ (पीसीबी) –  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली विक्रमांना गवसणी घालत आहे. कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरत आहे. विराटच्या या यशामागील रहस्य माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने उलगडून सांगितले आहे. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीच्या रुपात संघात दोन कर्णधार आहेत. नेतृत्व करताना या दोघांचीही मदत विराटला मिळते, असे गंभीर म्हणाला.

महेंद्रसिंग धोनी हा जगातील महान कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघानं दोनदा (टी-२० आणि वनडे) विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. तर रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला सर्वाधिक चार वेळा जेतेपद मिळालं आहे. कर्णधार म्हणून विराटला मिळत असलेल्या यशाचे श्रेय गंभीरने या दोघांना दिले आहे. अहमदाबादमधील विद्यापीठातील एका कार्यक्रमावेळी माध्यमांशी बोलताना तो बोलत होता. ‘विराटला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीने चांगली कामगिरी केली. त्याचे नेतृत्व चांगले आहे कारण त्याच्याकडे रोहित शर्मा आहे. याशिवाय धोनीसारखा मार्गदर्शक त्याला लाभला,’ असे गंभीर म्हणाला.

संघात प्रतिभावान खेळाडू नसतात तेव्हा कर्णधाराचा खरोखर कस लागतो. कोणत्याही फ्रॅन्चायजी संघाचे नेतृत्व करत आहात आणि तुम्हाला मदत करणारे खेळाडू संघात नसतील तर तेव्हा खऱ्या अर्थाने नेतृत्वाची कसोटी लागते. विराट कोहलीची कर्णधार म्हणून आयपीएलमधील कामगिरी तुम्ही पाहू शकता, याकडेही गंभीरने लक्ष वेधले.