रोहित शर्मा उपकर्णधार, नटराजनचा समावेश

0
401

मेलबर्न, दि. 1 (पीसीबी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तिसऱ्या सिडनी कसोटीपूर्वी आज दोन महत्वाचे निर्णय घेतले. मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने रोहित शर्माची उपकर्णधार म्हणून नियु्क्ती केली. त्याचवेळेस उमेश यादवच्या जागी टी. नटराजनला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. अजिंक्य रहाणे कर्णधार झाल्यावर पुजाराची उपकर्णधारपदी वर्णी लागली होती. मात्र, रोहित शर्मा कसोटीसाठी उपलब्ध झाल्यावर त्याला उपकर्णधार केल्याची घोषणा आज करण्यात आली. रोहित शर्मा आयपीएलमधील दुखापतीमुळे एकदिवसीय आणि टी २० मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. त्यानंतर विलगीकरणाच्या नियमामुळे तो पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. तिसऱ्या कसोटीसाठी तो आता संघासोबत सराव देखील करू लागला आहे. रोहितचा समावेश नक्की असला, तरी अजून तो सलामीला खेळणार की मधल्या फळीत याबाबत निर्णय झालेला नाही. या निर्णयावर मयांक अगरवाल आणि हनुमा विहारी यांचा तिसऱ्या कसोटी सामन्यातील समावेश अवलंबून असेल.

विराट कोहली मायदेशात परतल्यावर चेतेश्वर पुजाराची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याच वेळेस रोहित संघासाठी उपलब्ध झाला, की तोच उपकर्णधार असेल असे स्पष्ट केले होते.

नटराजनचा समावेश
उमेश यादव जखमी झाल्यामुळे कसोटी संघात त्याच्या जागी वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला स्थान देण्यात आले आहे. त्याचा कसोटीसाठी संघात समावेश नव्हता. टी २० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका झाल्यावर नटराजनला नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी संघासोबत ठेवण्यात आले होते.

अंतिम अकरा जणांची निवड अजून करण्यात आलेली नाही. आता उमेशच्या जागी अंतिम अकरात स्थान देताना संध व्यवस्थापनाला शार्दुल ठाकूर आणि नटराजन या पर्यांयांचा विचार करावा लागेल. शमी जखमी झाला, तेव्हा शार्दुला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, अंतिम अकरात निवड करताना महंमद सिराजला पसंती देण्यात आली होती.

शमी आणि उमेश यादव दोघे आता मायदेशी परतणार असून, त्यांना थेट राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनवर्सन कार्यक्रामासाठी पाठविण्यात येईल.