Desh

रोहित शर्माला वन-डे संघाचा कर्णधार बनवा!

By PCB Author

July 13, 2019

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे २०१९ विश्वचषक स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्य सामन्यात केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चीत केले आहे. या पराभवाचे पडसाद आता उमटायला लागलेले आहेत. बीसीसीआयची क्रिकेट प्रशासकीय समिती कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी पराभवाच्या कारणांबद्दल चर्चा करणार आहे. मात्र भारतीय कसोटी संघाचा माजी सलामीवीर पलंदाज वासिम जाफरने, नेतृत्वबदलाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वासिम जाफरने, मर्यादीत षटकांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्याची वेळ आली आहे का?? असा प्रश्न विचारला आहे. २०२३ विश्वचषक स्पर्धेत रोहितला भारतीय संघाचे नेतृत्व करताना पाहणे मला आवडेल, असे म्हणत वासिम जाफरने नवीन चर्चेला तोंड फोडलं आहे.

भारतीय संघ विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात निवड समिती विराट कोहली आणि काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याच्या तयारीत आहे. रोहित शर्मा या दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.