Maharashtra

रोहित पवार यांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू; सुजय विखेंचा सुचक इशारा

By PCB Author

June 02, 2019

कर्जत, दि. २ (पीसीबी) – पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. कर्जत-जामखेडमधून लढू इच्छिणाऱ्या रोहित पवार यांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू,  असा सुचक इशारा नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. कर्जत येथील सत्कार समारंभात ते बोलत होते.

कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना सुजय विखे-पाटील म्हणाले की, पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू, असे  ते म्हणाले.

महायुतीतील सर्वांनीच प्रामाणिकपणे काम केल्याने मी उच्चांकी मतांनी निवडून आलो. आता सर्वच ठिकाणी भाजपचे कमळ फुलवायचे आहे.  आपल्यावर आलेली जबाबदारी अहोरात्र कष्ट करून पूर्ण करू. माझ्या पराजयासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या शेजाऱ्यांना ताकद दाखवून दिलीच आहे.  त्यामुळे पालकमंत्र्यांना शेजाऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही,  असेही सांगून सुजय यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.