Maharashtra

रोहित पवारांकडून आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफ’ निर्णयाचं कौतुक

By PCB Author

January 18, 2020

मुंबई,दि.१८(पीसीबी) – ‘मुंबईमध्ये ‘नाईट लाईफ’ला परवानगी देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. याचं संपूर्ण श्रेय माझे मित्र आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना जातं’ असं म्हणत राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

मुंबईमध्ये वडापावच्या स्टॉलपासून तर हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स हे चोवीस तास सुरु ठेवता येणार आहेत. सध्या फक्त तारांकित हॉटेलमध्येच कॅफे २४ चालू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु नवीन निर्णयाचा सामान्य जनता आणि उद्योग-व्यावसायिक या दोघांनाही फायदा होईल, असंही ते म्हणाले आहेत.

दारू विक्री करणारे रेस्टॉरंट आणि दुकाने चोवीस तास उघडी ठेवता येणार नाहीत तर सध्याच्या नियमानुसारच मध्यरात्री दीड वाजेपर्यंतच त्यांना दुकाने उघडी ठेवता येणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्वावर घेण्यात आलेल्या या निर्णयाचे विकासाच्यादृष्टीने सकारात्मक परिणाम दिसतील, असंही ते म्हणाले आहे.