रॉजर फेडररची ऑस्ट्रेलियन स्पर्धेतून माघार

0
377

मेलबर्न दि.२९ (पीसीबी) : अव्वल टेनिसपटू रॉजर फेडरर याने अखेर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघ्याच्या दुखापतीने आपल्याला या स्पर्धेत खेळता येणार नाही, असे फेडररने म्हटले आहे. कारकिर्दीत प्रथमच फेडरर ऑस्ट्रेलियन स्पर्धेत खेळणार नाही. दोनच आठवड्यापूर्वी सेरेना विल्यम्स, फेडरर यांच्यासारखे अव्वल टेनिसपटू ऑस्ट्रेलियन स्पर्धेत खेळणार असे संयोजकांनी जाहिर केले होते. मात्र, गुडघ्यावरील दुसऱ्या शस्त्रक्रीयेमुळे आपण अजून मॅच फिट नसल्याचे कारण देत फेडररने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

दुखापतीच्या कारणाने ३९ वर्षीय फेडरर फेब्रुवारी महिन्यापासून टेनिस कोर्टवर उतरलेला नाही. काही दिवसांपासून त्याने दुबई हलकासा सराव देखील सुरु केला होता. या वेळी ऑस्ट्रेलियान स्पर्धा लांबली असल्याने आपल्या खेळणे शक्य होईल असे वाटले होते. पण, माझ्या हालचालींवर अजूनही मर्यादा पडल्या आहेत. त्यामुळे मी विश्रांती घेणे पसंत केले. हा निर्णय घेताना आपण खूप निराश आहोत, असे फेडरर म्हणाला. फेडररने २००० मध्ये या स्पर्धेत पदार्पण केले. तेव्हापासून आजपर्यंत एकाही स्पर्धेला तो मुकलेला नाही. त्याने सहा वेळा या स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. स्पर्धा संयोजकांनी फेडररला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या असून, पुढील वर्षी पुन्हा या स्पर्धेत खेळावे अशी अपेक्षाही संयोजकांनी व्यक्त केली आहे.

फेडरर आता २०२१च्या उर्वरित मोसमासाठी स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत फेडरर खेळणार नसला, तरी जोकोविच, सेरेना, अॅश्ले बार्टी हे प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. फेडररच्या माघारीने माजी अव्वल मानांकित अॅंडी मरे याला वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे.