रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट; केंद्र सरकारची बोनसची घोषणा

0
363

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. महिनाभरावर आलेल्या दिवाळीनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ११ लाख कर्माचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

दिवाळीला अजून एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना रेल्वे मंत्रालयाकडून आपल्या कर्मचाऱ्यांना खूशखबर देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस दिला जाणार आहे. याचा फायदा रेल्वेच्या ११ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. सलग सहाव्या वर्षी पहिल्यांदाच रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती देताना सांगितले.

 

दरम्यान, या महत्वाच्या निर्णयाबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाने ई-सिगारेटवरही बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “ई-सिगारेटचा वापर, उत्पादन, विक्री तसेच साठवणूक करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये याचे व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.”