रेल्वेतून मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास सहा पट दंड

0
479

नवी दिल्ली, दि.६ (पीसीबी) – रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विमान प्रवासाप्रमाणेच आता ट्रेनमधूनही मर्यादेपेक्षा जास्त लगेज नेताना सतर्क रहावे लागणार आहे. कारण, ठरलेल्या मर्यादेनुसार अतिरिक्त शुल्क न देता स्लीपर क्लासमधून ४० किलो आणि सेकंड क्लासमध्ये ३५ किलोपर्यंत लगेज नेता येणार आहे.

याशिवाय पार्सल ऑफिसमध्ये पेमेंट करुन अनुक्रमे ८० किलो आणि ७० किलो सामान नेता येईल. अतिरिक्त सामान हे माल डब्यात ठेवण्यात येते.

रेल्वे डब्यातून मोठ्या प्रमाणावर सामान नेले जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार रेल्वेने आपल्या ३० वर्षांपूर्वीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यानुसार अतिरिक्त सामान नेल्यास ठरलेल्या मर्यादेपेक्षा सहा पट दंड आकारण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील एका अधिकाऱ्याने दिली.
प्रवाशाला अतिरिक्त सामान नेताना पकडले गेले तर त्याला ठरलेल्या मर्यादेपेक्षा सहा पट अधिक दंड द्यावा लागेल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे डब्यांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. फिरत्या पथकांकडून या सामानावर नजर ठेवली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.