“रेमेडिसिवीरचा काळाबाजार करणाऱ्याला कळाले ते ग्राहक नसून पोलीस आहेत, तेव्हा…”

0
784

यवतमाळ,दि.०९(पीसीबी) – : यवतमाळ जिल्ह्यात रेमडिसिवर इंजेक्शनचा काळाबाजार जोरात सुरू असून गरजू करोना रुग्णांना न मिळणाऱ्या या इंजेक्शनची मनमानी दराने विक्री होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब येथील एका मेडिकलवर बनावट ग्राहक पाठवून सुरुवातीला तीन व नंतर सहा इंजेक्शन खरेदी केली व ही इंजेक्शन विकणाऱ्या डॉक्टरसह चौघांना रंगेहाथ अटक केली. यामध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कळंब येथील डॉ. अक्षय तुंडलवार यांच्या मेडिकलमधून रेमडिसिवर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने एक डमी ग्राहक पाठवून तेथे रेमडिसिवर इंजेक्शनची मागणी केली. सुरुवातीला ६० हजारात इंजेक्शन खरेदीचा व्यवहार ठरला. त्यानुसार मेडिकल स्टोअरमधील सावन अरुण राठोड (वय ३५) यांने कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली तीन इंजेक्शन आणून दिले. त्यावेळी तिथं साध्या वेषात असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्यांच्या सांगण्यावरून डॉ. अक्षय तुंडलवार (वय २५) वर्षे यालाही ताब्यात घेतले. कळंब येथील कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेला कंत्राटी परिचारक सौरभ मोगरकर याने इंजेक्शन पुरविल्याचे डॉक्टरने सांगितले. पोलिसांनी तात्काळ सौरभला ताब्यात घेतले.

अशाच प्रकारे दुसरा सापळा रचून रेमडेसिविरची विक्री करणाऱ्या बिल्किस बानो मोहम्मद इक्बाल अन्सारी (६७ वर्षे, राहणार – जाजू चौक यवतमाळ) हिला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या महिलेकडे १२ इंजेक्शनची मागणी केली. तिने सहा इंजेक्शन काढून दिले तर उर्वरित सहा रविवारी देण्याचे ठरले. पोलीस पथकाने लगेचच तिला अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप सिंह परदेशी, किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमोल पुरी, विवेक देशमुख, गजानन करेवाड, औषधे निरीक्षक सविता दातीर, गजानन डोंगरे, विशाल भगत, कवीश पाळेकर, निलेश राठोड यांनी केली.