रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना अटक; 21 इंजेक्शन जप्त

0
780

पिंपरी, दि. 10 (पीसीबी): रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका मेडिकल दुकानदाराचाही समावेश आहे. मेडिकल दुकानदार अन्य दोघांना रेमडेसीवीर इंजेक्शन अधिक किमतीने विकण्यासाठी देत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 9) करण्यात आली आहे.

शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय 34, रा. जयमल्हार नगर, दत्तकॉलनी, थेरगाव), कृष्णा रामराव पाटील (वय 22, रा. 16 नंबर बस स्टॉप, थेरगाव), निखील केशव नेहरकर वय 19, रा. बिजलीनगर चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी शशिकांत याचे चिंचवड येथे आयुश्री मेडीकल आहे. आरोपी कृष्णा एका रुग्णालयात नर्सिंग स्टाफ आहे. तर आरोपी निखिल हा डिलिव्हरी बॉय आहे.

शशिकांत याच्या सांगण्यावरून कृष्णा आणि निखिल हे दोघेजण गरजू रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शन मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीने विकत होते. दोन इंजेक्शनची डिलिव्हरी घेऊन रविवारी मध्यरात्री पावणेतीन वाजता हे दोघेजण दोन दुचाकीवरून जात होते. काळेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या सरप्राईज नाकाबंदीमध्ये दोघेजण अडकले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन रेमडेसीवीर इंजेक्शन मिळून आले.

रेमडेसीवीर इंजेक्शनच्या विक्री परवाना बाबत त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा औषध विक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात ते मेडिकल चालक शशिकांत पांचाळ याच्या सांगण्यावरून ते इंजेक्शन विकण्यासाठी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वी देखील दोघांनी अशा प्रकारे इंजेक्शन विकून पांचाळ याला पैसे आणून दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी शशिकांत पांचाळ याला ताब्यात घेतले. त्याच्या कारची (एम एच 14 / डी ए 4881) झडती घेतली असता सीटच्या खाली 19 रेमडेसीवीर इंजेक्शन पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एकूण 21 रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त केली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अवधुत शिंगारे, पोलीस अंमलदार दत्तप्रसाद चौधरी, जितेंद्र उगले, अतिश जाधव, होमगार्ड निखील सपकाळ, होमगार्ड रोहन गुंड यांच्या पथकाने केली.